
जळगांव | प्रतिनिधी l आसोदा येथील बहुचर्चित गोळीबार प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या खटल्याचा (गुन्हा रजिस्टर नंबर ८९/२०२३) निकाल अखेर न्यायालयाने दिला आहे. सेशन केस नंबर १२२/२०२३ अंतर्गत चालविण्यात आलेल्या या खटल्यातून न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
गंभीर कलमांखाली झाले होते आरोप :
या प्रकरणात आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) नुसार कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ५०४ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान करणे), ५०६ (गुन्हेगारी स्वरूपाची धमकी), ३४ (समान उद्देश), ७५ (विशिष्ट गुन्ह्यांसाठी वाढीव शिक्षा), तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७ आणि १३५, आणि आर्म्स अॅक्ट कलम ३/२५ (शस्त्रास्त्रांशी संबंधित) अंतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले होते.
साक्षी-पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता :
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदारांचे जबाब न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने या जबाबांची आणि पुराव्यांची सखोल छाननी केली. मात्र, साक्षी आणि सादर केलेले पुरावे आरोपींवरील दोष ‘संशयाच्या पलीकडे’ सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे न्यायालयाने नमूद केले. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आरोपी चेतन सुरेश आळंदे (उर्फ चिंग्या) आणि कैयुर कैलास पंधारे यांची निर्दोष मुक्तता केली.
ॲड. ढाके यांचा प्रभावी युक्तिवाद :
या संपूर्ण खटल्यात आरोपींच्या वतीने अॅड. केतन ढाके यांनी अत्यंत प्रभावी आणि मुद्देसूद युक्तिवाद करत सरकार पक्षाच्या पुराव्यांमधील त्रुटी न्यायालयासमोर मांडल्या. तर, सरकार पक्षाच्या वतीने अॅड. रमाकांत सोनवणे यांनी बाजू मांडली.
न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालामुळे कायदेशीर प्रक्रियेत पुराव्यांचे निर्विवाद महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.





