
खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l काही दिवसांपूर्वीच नगरपालिकाचे निवडणुका पार पडल्यानंतर आता पुन्हा महानगरपालिकाचे निवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी आणि अनिल चौधरी हे महापालिका निवडणुकीसाठी जळगावात ठाण मांडून बसले आहेत.
भुसावळ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मंत्री संजय सावकारे यांची पत्नी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होत्या परंतू त्यांचा पराभव झाला आणि राष्ट्रवादी कांग्रेस चे नगराध्यक्ष उमेदवार विजयी झाले. त्यामुळे मंत्री सावकारे यांना मोठा धक्का बसला आणि चौधरी बंधूंना यश मिळाले.
“ज्याप्रमाणे मंत्री संजय सावकारे यांच्या जिभेला शनी लागला आणि त्यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे जनतेने त्यांना धडा शिकवला, तशी चूक आम्ही होऊ देणार नाही. आम्ही कुणाचा अपमान करायला नाही, तर जळगावचा विकास करण्यासाठी आणि निवडणूक जिंकायला आलो आहोत,” असा वक्तव्य अनिल चौधरी यांनी केला.
जळगावातील कोजी कोटेज हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची ‘गुप्त बैठक’ पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आगामी महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
भुसावळ पॅटर्न आता जळगावात?
भुसावळ नगरपालिकेतील यशाचा दाखला देत अनिल चौधरी म्हणाले की, “भुसावळच्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आणि तिथे आमचा नगराध्यक्ष व बहुसंख्य नगरसेवक निवडून दिले. जनतेने दिलेली ही साथ आमच्या कामाची पावती आहे. आता तोच विश्वास सार्थ ठरवत जळगाव महानगरपालिकेतही महाविकास आघाडीचाच महापौर कसा निवडून येईल, यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलो आहोत.”
काही दिवस जळगावातच तळ :
निवडणुकीच्या नियोजनासाठी संतोष चौधरी आणि अनिल चौधरी हे दोन्ही दिग्गज नेते पुढील काही दिवस जळगाव शहरात मुक्कामी आहेत. या काळात प्रभागांमधील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, स्थानिक समीकरणे आणि नव्या चेहऱ्यांची निवड यावर विशेष भर दिला जाणार आहे.





