
चोपड्यात भाजपमध्ये ‘आयात’ नेत्यावरून धुसफुस; प्रभाकर सोनवणेंच्या घरवापसीमुळे निष्ठावंत आक्रमक
जळगाव: चोपडा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, ‘उबाठा’ गटाचे माजी उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. सोनवणे यांच्या या ‘घरवापसी’मुळे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांसह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्येही तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना पुन्हा रेड कार्पेट दिले जात असल्याने महायुतीत अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रभाकर सोनवणे यांचा राजकीय प्रवास
अत्यंत वादळी राहिला आहे. २०१४ मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मार्केट कमिटीचे संचालक म्हणून त्यांनी सुरुवात केली होती, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी अंजनाताई सोनवणे यांनी जळगाव शहरात भाजपच्या नगरसेविका म्हणूनही काम पाहिले आहे. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन ‘उबाठा’ गटाकडून निवडणूक लढवली होती. आता पराभवानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी पुन्हा भाजपची वाट धरल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सोनवणे यांची ही राजकीय खेळी
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचे बोलले जात आहे. ते आपल्या पत्नी अंजनाताई सोनवणे यांच्यासाठी म्हसावद-बोरनार जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, याच गटातून भाजपचे निष्ठावान चेहरा मानले जाणारे माजी जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत आहेत. पक्षासाठी सातत्याने झटणाऱ्या निष्ठावंतांना डावलून आयत्या वेळी आलेल्या बंडखोरांना संधी दिल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.
या सर्व प्रकारामुळे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) गोटातही संतापाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारासमोर दोन वेळा बंडखोरी करणाऱ्या नेत्याला पुन्हा पक्षात घेतल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याच गटातून शिंदे सेनेचे युवा नेते पवन सोनवणे हे देखील निवडणुकीची तयारी करत असल्याने, प्रभाकर सोनवणेंच्या प्रवेशामुळे त्यांच्यासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. बंडखोरांना स्थान दिल्याने महायुतीच्या मतांमध्ये फूट पडण्याची भीती व्यक्त होत असून, पक्षश्रेष्ठी ही नाराजी कशी दूर करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




