
LCB ची धडाकेबाज कामगिरी
गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि मोटारसायकलसह दोघांना अटक
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडाकेबाज कारवाई करत दोन संशयित आरोपींना गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्रधारकांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, उमटी गावाकडून कृष्णापूर–मामलदे मार्गे चोपड्याकडे दोन इसम मोटारसायकलवरून गावठी पिस्तूल बाळगून फिरत आहेत.
माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी उमटीकडून येणाऱ्या संशयित मोटारसायकलला थांबवून त्यावरील दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे राहुल कुवरसिंग पावरा (२२, रा. उमटी, ता. चोपडा) आणि गणपत प्रभाकर किर्तने (२८, रा. असोला, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) अशी सांगितली.
आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून १ गावठी बनावटीचे पिस्तूल,५ जिवंत काडतुसे,१ मोटारसायकल (हिरो होंडा),२ मोबाईल फोनअसा एकूण सुमारे ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.विनापरवाना अग्निशस्त्रे बाळगल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, हवालदार विष्णू विन्हाडे, दिपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे व इतर अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.





