
जळगाव जिल्हा सेपक टकरा संघटनेकडून खेळाडू नोंदणी सुरू
१ ते ३० एप्रिलदरम्यान प्रक्रिया; जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावर संधी
जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा सेपक टकरा असोसिएशनतर्फे २०२६-२७ या सत्रासाठी खेळाडू नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तसेच परिसरातील गुणवंत खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली.
ही नोंदणी प्रक्रिया १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार असून, सर्व इच्छुक खेळाडूंना अर्ज करता येणार आहे. सब-ज्युनियर गटासाठी ७०० रुपये तर ज्युनियर आणि सीनियर गटासाठी १००० रुपये नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
नोंदणीकृत खेळाडूंना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागाची संधी मिळणार आहे. तसेच निवड चाचणीत सहभागी होण्याची संधी, प्रशिक्षण शिबिरे, विविध स्पर्धा आणि करिअर मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
सेपक टकरा हा खेळ देशात वेगाने लोकप्रिय होत असून, संघटनेच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना आपली गुणवत्ता विकसित करण्याची संधी मिळणार आहे. शिक्षण, रोजगार आणि राष्ट्रीय स्तरावर संधी निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचेही सांगण्यात आले.
नोंदणी ३१ मार्च २०२७ पर्यंत वैध राहणार असून, खेळाडूंना नियमित प्रशिक्षण शिबिरे, प्रमाणित प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभागाची संधी मिळणार आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी मिर्झा आसिफ, फैजान शेख आणि आमिर खान यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





