
जळगावातील वाहतूक कोंडीवर पोलिस प्रशासन गंभीर
शहरातील जॅमिंग पॉइंट, अतिक्रमण आणि पार्किंग समस्यांवर होणार ठोस उपाययोजना
जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक समस्यांच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीत सहा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच वाहतूक व्यवस्थेचा अनुभव असलेले अंमलदार उपस्थित होते.
बैठकीदरम्यान शहरातील विविध पोलीस स्टेशन हद्दींमध्ये निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. शहरातील प्रमुख चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी, बाजारपेठांमधील वाढती गर्दी, रस्त्यांवरील अतिक्रमण, अनियंत्रित वाहन पार्किंग तसेच अनेक ठिकाणी बंद पडलेली सिग्नल व्यवस्था या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. विशेषतः शहरातील जॅमिंग पॉइंट ओळखून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचारमंथन करण्यात आले. शहरातील हॉकर्स व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासोबतच प्रमुख रस्त्यांवर सूचना फलक आणि येलो स्ट्रिप्स लावणे, बंद असलेले सिग्नल तातडीने सुरू करणे तसेच आवश्यक ठिकाणी नवीन सिग्नल बसविणे यावर चर्चा झाली. त्याचबरोबर काही भागांत वन-वे वाहतूक व्यवस्था लागू करणे, इव्हन-ऑड पार्किंग प्रणाली राबविणे, तसेच अपघातप्रवण भागांमध्ये रंब्लर्स आणि स्पीडब्रेकर्स उभारण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, शहरातील वाहतूक समस्यांवर प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी पोलिस विभागाकडून विस्तृत फोटो आणि व्हिडिओसह सादरीकरण तयार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली असून, ही बैठक दिनांक १६ मे रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे.
या बैठकीमध्ये पोलिस विभागाकडून शहरातील वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आराखडा सादर करण्यात येणार असून, विविध विभागांच्या समन्वयातून वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि पार्किंग समस्यांवर ठोस निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील वाढती वाहनसंख्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक समस्यांमुळे या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





