जगमाता परिसरातील पाणीटंचाई तीव्र; महिलांचा ‘हंडा मोर्चा’चा इशारा

जगमाता परिसरातील पाणीटंचाई तीव्र; महिलांचा ‘हंडा मोर्चा’चा इशारा
सावदा नगरपालिकेला नागरिकांचे निवेदन, तातडीच्या उपाययोजनांची मागणी
मुख्तार शेख
सावदा : शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत येणाऱ्या जगमाता परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि अनियमित वेळेत पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांनी सावदा नगरपालिकेला निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
तसेच समस्या न सुटल्यास महिलांसह नागरिकांच्या वतीने नगरपालिकेवर “हंडा मोर्चा” काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जगमाता परिसरातील अनेक कुटुंबे शेतकरी व शेतमजूर वर्गातील असून आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. अनेकांच्या घरी मोटारपंप नसल्यामुळे त्यांना पाणी साठवणे शक्य होत नाही. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हातमजुरी करणारा वर्ग सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडत असतो, मात्र पाणी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली आहे.
या समस्येबाबत स्थानिक नगरसेवक तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदनाद्वारे नागरिकांनी जगमाता परिसरात नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेत मोटारधारकांनी मोटारी बंद ठेवण्याचे नियम काटेकोरपणे लागू करावेत, जेणेकरून सर्व नागरिकांना समान दाबाने पाणी मिळू शकेल, अशी मागणी करण्यात आली आहे. गरज पडल्यास अतिरिक्त पाणीटँकरची व्यवस्था करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर अजय राजेंद्र भोरटकी, मुरलीधर लहान सरोदे, नितीन मधुकर सपकाळे, निलिमा वामन भारंबे, रुपाली खंडेराव भारंबे, मंगला वासुदेव भारंबे, मिनाक्षी प्रेमचंद भारंबे, शीतल अजय भंगाळे, अरुणा शरद पाटील, राहुल दीपक सरोदे यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नागरिकांच्या वाढत्या संतापामुळे आता नगरपालिका प्रशासन या प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





