
एसीबीने सील केलेल्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; दोघांना रंगेहात अटक
लाचखोरी प्रकरणातील अधिकाऱ्याच्या जळगावातील घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न
जळगाव | प्रतिनिधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई केलेल्या सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घरात घुसून कुलूप तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमागील हेतूचा पोलीस तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने किरण चौधरी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर त्यांच्या जळगावातील साईप्रभा आर्केड, गणेश कॉलनी येथील राहत्या घराला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावने घरझडतीसाठी सील केले होते.
दरम्यान, सीलबंद घरातून आवाज येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासणीदरम्यान घराच्या मागील बाजूने शिडी लावून आत प्रवेश केलेल्या दोन संशयितांना जागीच पकडण्यात आले.
या प्रकरणी प्रसाद वसंत नारखेडे (वय ३३, रा. डांभुर्णी, ता. यावल) आणि प्रविण अशोक महाजन (वय ३६, रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(२), २३८ व ६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी सीलबंद घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तू अथवा संभाव्य पुरावे चोरी करून किंवा नष्ट करून घरझडतीवर परिणाम करण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात काही महत्त्वाच्या बाबींचा पोलीस तपास सुरू असून, हा घुसखोरीचा प्रयत्न संबंधित लोकसेवकाच्या सांगण्यावरून झाला होता का, घरातील रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू तपास यंत्रणेच्या हाती लागण्यापूर्वी हटविण्याचा कट होता का, तसेच अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचे संबंधित अधिकाऱ्याशी नेमके संबंध काय आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. या मुद्द्यांबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नसून तपास पूर्ण होणे बाकी आहे.





