जिल्ह्यात अवैध शस्त्रांवर पोलिसांचा धडाका

जिल्ह्यात अवैध शस्त्रांवर पोलिसांचा धडाका
धरणगाव व भुसावळात दोन स्वतंत्र कारवाया; गावठी पिस्तुलांसह तिघे जेरबंद
जळगाव : जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून गुरुवारी धरणगाव आणि भुसावळ येथे दोन स्वतंत्र कारवायांमध्ये गावठी पिस्तुलांसह तिघांना अटक करण्यात आली. या कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.
गिरणा नदीपात्रातून एकाला अटक
धरणगाव पोलिसांना १४ मे रोजी सायंकाळी धरणगाव शिवारातील गिरणा नदी पात्रात एक इसम संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आनंदा बळीराम सपकाळे (वय ३९, रा. सिद्धार्थ नगर, आव्हाणे, ता. जळगाव) याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिन जप्त करण्यात आले.
सदर शस्त्राचा कोणताही वैध परवाना नसल्याने आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर आणि त्यांच्या पथकाने केली.
भुसावळात पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
दुसरी कारवाई भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलिसांनी केली. शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडे पीर बाबा दर्ग्याच्या मागील मोकळ्या जागेत काही संशयित व्यक्ती असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी असद अली शेख खालीद अली (वय १९, रा. आझाद नगर, बुऱ्हाणपूर) आणि मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांना अटक करण्यात आली आहे.
अवैध शस्त्रधारकांवर कारवाईचा इशारा
दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांत आर्म अॅक्टन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. शहर आणि जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.





