खान्देशगुन्हेजळगांव

पहाटेच्या अपघातातून उघड झाला मोठा कट? पुलावर थांबलेल्या स्कॉर्पिओत सापडले पिस्तूल, काडतुसे अन् बनावट नंबर प्लेट!

पहाटेच्या अपघातातून उघड झाला मोठा कट? पुलावर थांबलेल्या स्कॉर्पिओत सापडले पिस्तूल, काडतुसे अन् बनावट नंबर प्लेट!
मुक्ताईनगर पोलिसांची धडक कारवाई; दरोड्याच्या तयारीच्या संशयावरून दोघे जेरबंद, १८ गुन्ह्यांतील सराईत आरोपी फरार

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

मुक्ताईनगर तालुक्यात पहाटे घडलेल्या एका किरकोळ अपघातातून गंभीर गुन्हेगारी कट उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलावर अपघातग्रस्त अवस्थेत उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ वाहनाची तपासणी करताना पोलिसांना देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, लोखंडी रॉड, दोरी आणि बनावट क्रमांक प्लेट आढळून आली. या प्रकरणी दरोड्याच्या तयारीच्या संशयावरून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन जण फरार झाले आहेत.

माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे सेकंड मोबाईल पथक नियमित गस्त घालत असताना बुलढाणा सीमेवरील पुलावर एका स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ अपघात झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांना पाहताच वाहन चालकासह दोन जण अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. वाहनात असलेल्या अन्य दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली.

चौकशीदरम्यान संशयितांकडून त्यांच्या हालचालींबाबत समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यामुळे वाहनाची कसून झडती घेण्यात आली. यावेळी वाहनातून एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, एक दोरी, लोखंडी रॉड, दोन मोबाईल फोन तसेच बनावट क्रमांक प्लेट जप्त करण्यात आली. या साहित्यामुळे आरोपी दरोड्याच्या किंवा अन्य गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासादरम्यान फरार झालेला वाहन चालक प्रशांत उर्फ परशुराम गायकवाड असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध बीड, अहमदनगर, बुलढाणा आणि पुणे जिल्ह्यांत सुमारे १८ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि त्याला बीड कारागृहात स्थानबद्धही करण्यात आले होते.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी चंद्रकांत विष्णू वाघ आणि कैलास कारभारी घोडके या दोघांना अटक केली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. अटक आरोपींकडे सखोल चौकशी सुरू असून या टोळीचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे मुक्ताईनगर परिसरातील गुन्हेगारी हालचालींवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button