गुणवंत पोलीस पाल्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव

गुणवंत पोलीस पाल्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव
जळगाव | प्रतिनिधी
जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींनी शिक्षण, क्रीडा, कला तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यास प्रेरणादायी पुस्तक भेट देत त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि अनुभव जाणून घेत त्यांच्याशी मुक्त संवाद साधला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना श्रीकांत धिवरे म्हणाले की, “पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कुटुंबीयांचा आणि विशेषतः मुलांचा त्याग मोठा असतो. या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळविले आहे. त्यांच्या यशाचा गौरव करणे ही पोलीस दलाची जबाबदारी आहे. प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण करेल.”
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजविणे आणि भविष्यात उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशा सन्मानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून इतर विद्यार्थ्यांनाही उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
पोलीस दलाकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक आणि विद्यार्थ्यांनी स्वागत केले असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.





