इतर

पालघरचा गोलवर्षाव; महिला फुटबॉल स्पर्धेत रंगला थरार

पालघरचा गोलवर्षाव; महिला फुटबॉल स्पर्धेत रंगला थरार

आज उपांत्य फेरीचे सामने; जळगावातील महिला व महिला संघटनांना मैदानात येण्याचे जोरदार आवाहन

जळगाव | प्रतिनिधी : श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात गेल्या तीन दिवसांपासून वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आणि जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या आयोजनाखाली सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत रविवारी रंगतदार सामने पाहायला मिळाले. विशेषतः पालघर संघाने दमदार कामगिरी करत सोलापूरचा तब्बल १४-० असा पराभव करून स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा नवा विक्रम नोंदवला.

उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांमध्ये पालघरने सोलापूरचा १४-०, वर्ध्याने नंदुरबारचा ४-२, ठाण्याने संभाजीनगरचा ७-१, तर कोल्हापूरने बुलढाण्याचा २-० असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एमी टॅंक (पालघर), इच्छा रंगारी (वर्धा), सना कोटियान (ठाणे) आणि सानिका भोसले (कोल्हापूर) यांना उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले.

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तसेच विश्व कांस्यपदक विजेत्या कॅरमपटू आयेशा खान, पोलीस क्रीडा विभागाचे प्रमुख संतोष सुरवाडे, एकता संघटनेचे अध्यक्ष धर्मगुरू मुक्ती खलील, प्रा. डॉ. प्रणव बेलोरकर, सेंट्रल रेल्वेचे फुटबॉलपटू उज्ज्वल काळे, ऑल इंडिया हॉकीपटू अकील शेख आणि एकता ग्लोबल न्यूजचे मतीन पटेल यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.सोमवारी उपांत्य फेरीचे चार सामने होणार आहेत.

सकाळी ७.३० वाजता — पालघर विरुद्ध मुंबई
सकाळी ९ वाजता — वर्धा विरुद्ध अहमदनगर
सकाळी १०.३० वाजता — ठाणे विरुद्ध यवतमाळ
दुपारी १२ वाजता — पुणे विरुद्ध कोल्हापूर
जळगावातील महिलांनी मैदानात यावे!

राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या महिला खेळाडू जळगावच्या मैदानावर मेहनत, कौशल्य आणि जिद्दीचे शानदार प्रदर्शन करत आहेत. मात्र, जळगावमध्ये एवढ्या मोठ्या राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धेचे आयोजन होऊनही स्थानिक महिला आणि महिला संघटनांची अपेक्षित उपस्थिती दिसून येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर डॉ. उल्हास पाटील, डॉ. अनिता कोल्हे आणि फारुक शेख यांनी जळगावातील महिला, युवती, विद्यार्थिनी, महिला संघटना आणि क्रीडाप्रेमींना स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रीडा संकुलात उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

“ही केवळ फुटबॉलची स्पर्धा नाही, तर आपल्या मुली आणि महिलांच्या जिद्दीचे, कौशल्याचे आणि भविष्याचे मैदान आहे. इतर जिल्ह्यांतून आलेल्या या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी जळगावातील महिलांनी मोठ्या संख्येने मैदानात यावे. आपल्या शहरात एवढी मोठी महिला क्रीडा स्पर्धा होत असताना आपण प्रेक्षक म्हणूनही उपस्थित राहू नये, ही विचार करण्याची बाब आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

महिला संघटनांनी आपल्या सदस्य महिला आणि युवतींसह क्रीडा संकुलात उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असेही त्यांनी सांगितले.

“या मुलींना आपल्या टाळ्यांची गरज आहे. मैदानातील तुमची उपस्थिती त्यांच्या आत्मविश्वासाला नवी ताकद देईल. जळगावच्या महिलांनी पुढे यावे, खेळाला प्रोत्साहन द्यावे आणि या खेळाडूंसोबत एकजुटीचा संदेश द्यावा,” असे आवाहन डॉ. उल्हास पाटील, डॉ. अनिता कोल्हे आणि फारुक शेख यांनी केले.

स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी फिजिओथेरपीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी कॉलेजच्या डॉ. पूर्वा तिवारी, डॉ. सुमेधा भावसार, डॉ. सानिका वाघमोडे, डॉ. नयन शेटे, डॉ. सलोनी कीर, डॉ. आशिष पाटील, डॉ. वैष्णवी शेलार, डॉ. यश देवरे, डॉ. अंशिता वर्मा आणि डॉ. विशाल दुर्वे हे खेळाडूंना फिजिओथेरपी सेवा देत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button