
विवाहितेचे स्कॉर्पिओतून अपहरण; सोडविण्यास गेलेल्या जावयावर हत्याराने हल्ला
जामनेर तालुक्यातील खादगाव येथील घटना; महिलांनाही मारहाण, गोळी घालण्याची धमकी; सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा
जामनेर | प्रतिनिधी तालुक्यातील खादगाव येथे कौटुंबिक वादातून विवाहितेचे तिच्याच माहेरच्या नातेवाईकांनी भरदिवसा स्कॉर्पिओ वाहनातून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीची सुटका करण्यासाठी पुढे सरसावलेल्या पतीवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून जखमी करण्यात आले, तर मध्यस्थी करणाऱ्या आई व बहिणीलाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खादगाव येथील शुभम ज्ञानेश्वर सोनवणे (वय २९) हे ११ जून रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरी असताना त्यांच्या पत्नी पायल हिचे माहेरचे नातेवाईक तेथे आले. जुन्या वादातून त्यांनी शुभम यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पायल हिलाही मारहाण करत तिचे हातपाय पकडून घराबाहेर ओढत नेण्यात आले.
पत्नीची सुटका करताना पती जखमी
पत्नीला आरोपींच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शुभम सोनवणे यांच्यावर आरोपी ओमप्रकाश पटेल याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात शुभम यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी पायल हिला जबरदस्तीने स्कॉर्पिओ वाहनात बसवून तेथून पळ काढला.
आई-बहिणीलाही मारहाण
घटनेदरम्यान शुभम यांची आई सुरेखा सोनवणे आणि बहीण शितल चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच “बंदुकीच्या गोळीने ठार मारू” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. यावेळी बहिणीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून फेकण्यात आले. गोंधळात शुभम यांचा रेडमी नोट १० प्रो कंपनीचा मोबाईलही आरोपी घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी शुभम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ओमप्रकाश धनराज पटेल, फिर्यादीचे मामासासरे, सुरज ओमप्रकाश पटेल आणि सुरेश पटेल (सर्व रा. वाणी, जि. यवतमाळ) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३८, ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील जोशी करीत आहेत.





