इतर

ॲल्युमिनियम स्क्रॅपच्या आमिषाने भंगार व्यावसायिकाला लुटले

ॲल्युमिनियम स्क्रॅपच्या आमिषाने भंगार व्यावसायिकाला लुटले

बंदुकीचा धाक, मारहाण; ४ लाखांहून अधिक ऐवज लंपास, २० ते २५ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा

मुक्ताईनगर प्रतिनिधी : ॲल्युमिनियम स्क्रॅप देण्याच्या बहाण्याने भिवंडी येथील भंगार व्यावसायिकाला मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा शिवारात बोलावून बंदुकीचा धाक दाखवत लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात २० ते २५ जणांच्या टोळीविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्क्रॅप विक्रीचे आमिष

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील भंगार व्यावसायिक अन्सारी हे त्यांचे मित्र व मुलासह ८ जून २०२६ रोजी सकाळी हलखेडा येथे आले होते. शिवा नावाच्या इसमाने ॲल्युमिनियम स्क्रॅप विक्रीचे आमिष दाखवून त्यांना येथे बोलावले होते.

बंदुकीचा धाक दाखवत मारहाण

हलखेडा शिवारात पोहोचताच शिवा आणि त्याच्या १५ ते २० साथीदारांनी अन्सारी व त्यांच्या सोबत्यांना घेरले. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत त्यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या.

४ लाखांहून अधिक मुद्देमाल लंपास

दरोडेखोरांनी फिर्यादीकडील २ लाख ५५ हजार ५०० रुपये रोख रक्कम, बँक खात्यातून ऑनलाइन ट्रान्सफर केलेली रक्कम, मोबाईल फोन, मनगटी घड्याळ आणि चांदीची अंगठी असा एकूण ४ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

विवस्त्र करून व्हिडिओ; जीवे मारण्याची धमकी

दरोडेखोरांनी लुटीनंतर फिर्यादी व त्यांच्या साथीदारांना विवस्त्र करून त्यांचा व्हिडिओ तयार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्यांना तेथून हुसकावून लावण्यात आले.

पोलिसांकडून आरोपींचा शोध

घटनेनंतर पीडितांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक आशिष आडुसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील पुढील तपास करीत आहेत. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

“स्क्रॅप व्यवहाराच्या आमिषाने बोलावून दरोडा टाकल्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपींचा लवकरच छडा लावला जाईल,” असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button