खान्देशजळगांवशासकीयशिक्षणसामाजिक

विकसित भारत रोजगार योजने’तून देशभरात ७० लाख नवे रोजगार; जळगावात तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप

विकसित भारत रोजगार योजने’तून देशभरात ७० लाख नवे रोजगार; जळगावात तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप

​पंतप्रधानांच्या हस्ते २,४०० कोटी रुपयांचे डीबीटीद्वारे थेट प्रोत्साहन अनुदान वितरित; गांधी तीर्थ येथे विशेष सोहळा

​जळगाव (प्रतिनिधी): देशातील युवा शक्तीला रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पहिल्यांदाच नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत देशभरातील लाभार्थ्यांना तब्बल २,४०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान थेट बँक खात्यात (DBT) वितरित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनातून या योजनेचा शुभारंभ झाला. या राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशातील २०० प्रमुख केंद्रांवर करण्यात आले, ज्यामध्ये जळगाव येथील ‘गांधी तीर्थ’च्या कस्तुरबा सभागृहाचाही समावेश होता.

जळगावच्या सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती:

जळगाव येथील विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन नाशिक विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त-१ अतुल कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी जळगावच्या खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, भविष्य निर्वाह निधी आयुक्त-२ मनोज कोळी, सहाय्यक आयुक्त मोहित दीक्षित, पीएफ कार्यालयाचे दीपक चौधरी यांसह जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी आणि तरुण लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिल्लीतील मुख्य सोहळ्याला केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनीही हजेरी लावली होती.

​पंतप्रधानांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रतिपादन:
दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील २०० केंद्रांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक असून, विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका पायाचा दगड ठरेल. ही योजना केवळ नोकऱ्या देणारी नसून पहिल्यांदा नोकरीत येणाऱ्या तरुणांच्या आकांक्षांना बळ देणारी आहे.”

गेल्या १२ वर्षांत ‘मेक इन इंडिया’, ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘मिशन मॅन्युफॅक्चरिंग’ सारख्या उपक्रमांमुळे देशात स्टार्टअप्स आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला गती मिळाली असून रोजगार वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.
​७० लाख तरुणांना सामाजिक सुरक्षा:
योजनेची आकडेवारी मांडताना पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, आतापर्यंत देशात सुमारे ७० लाख नवीन रोजगार निर्माण झाले असून, या सर्वांना पीएफ (भविष्य निर्वाह निधी) च्या कक्षेत आणून सामाजिक सुरक्षा देण्यात आली आहे. यातील २० लाख युवकांनी नोकरीचे पहिले ६ महिने पूर्ण केले आहेत.

​जळगाव येथील कार्यक्रमात जैन इरिगेशनमध्ये नव्याने रुजू झालेल्या १० सहकाऱ्यांसह अनेक लाभार्थी कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे अधिकृत वाटप करण्यात आले. लाभार्थी पूजा धनगर, नियोक्ते प्रमोद पाटील आणि जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे आणि नितीन चोपडा यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button