नशिराबाद मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी; चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
घनकचरा टेंडर, पाणीपुरवठा व निधी वितरणात अनियमिततेचे आरोप; जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेची कारवाईची मागणी

नशिराबाद मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी; चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
घनकचरा टेंडर, पाणीपुरवठा व निधी वितरणात अनियमिततेचे आरोप; जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेची कारवाईची मागणी
प्रतिनिधी | जळगाव
नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आर. आर. सोनवणे यांची तात्काळ बदली करून त्यांच्या कार्यकाळातील विविध कामांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप साळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आर. आर. सोनवणे हे २२ मार्च २०२२ पासून नशिराबाद नगरपरिषदेत कार्यरत असून, शासनाच्या नियमानुसार मुख्याधिकाऱ्यांचा कार्यकाळ साधारणतः तीन वर्षांचा असतानाही ते अद्याप एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मागील पाच वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर एकाच ठेकेदाराला देण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच ठेकेदाराकडील कामगारांना सुरक्षा साहित्य, पीएफ व वेतनाशी संबंधित सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
दिव्यांगांसाठीच्या पाच टक्के निधीच्या वितरणात अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित लाभार्थ्यांना वेळेवर निधी मिळत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गावातील पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसाआड होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
याशिवाय, ५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण न झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात यापूर्वी स्थानिक स्तरावर अनेक तक्रारी करण्यात आल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून मुख्याधिकारी आर. आर. सोनवणे यांची बदली करावी तसेच त्यांच्या कार्यकाळातील सर्व निर्णय आणि कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप साळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.





