माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर आयोजित जनआक्रोश धरणे आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश दिलीप बेलदार यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर 28 जून रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याबाहेर जनआक्रोश धरणे आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान भाषण करताना माजी खासदार उन्मेष पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध अंतर्गत कलम 352 आणि 356(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात नोंदविण्यात आलेले आरोप हे फिर्यादीतील मजकुरावर आधारित असून संबंधित पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.





