इतर

आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून; पती अटकेत

आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून; पती अटकेत

शरीर सुखाच्या मागणीस नकार दिल्याने संताप; रावेर तालुक्यातील निमड्या येथील धक्कादायक घटना

रावेर : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील निमड्या येथे आठ महिन्यांच्या गरोदर महिलेचा तिच्याच पतीने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

लालूबाई शरद पावरा (वय २५) या महिलेचा ४ मार्च रोजी घराबाहेर गेल्यानंतर ५ मार्च रोजी सातपुडा पर्वतरांगातील दुर्गम दरीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. घटनेनंतर ६ मार्च रोजी जळगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले.

प्राथमिकदृष्ट्या आत्महत्येचा संशय असला तरी पोलिसांनी सखोल तपास केला असता हा खून असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन व पथकाने तपास करत आरोपी पती शरद मिरलाल पावरा यानेच पत्नीचा खून केल्याचे उघड केले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, लालूबाई या आठ महिन्यांच्या गरोदर असताना पतीने शरीर सुखाची मागणी केली होती. त्यास पत्नीने नकार दिल्याने संतप्त होऊन आरोपीने तिचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी अंधारमळी येथील पोलीस पाटील रमजान तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शरद पावरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button