
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; दोन बालविवाह रोखले, भविष्यात बालविवाह करणाऱ्यांना थेट तुरुंगाचा इशारा
बालविवाह रोखण्यासाठी विशेष मोहीम; पालकांसह पुरोहित, काझी, डेकोरेटर्स, बँड पथक व छायाचित्रकारांवरही होणार कारवाई
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याने बालविवाहासारख्या सामाजिक अनिष्ट प्रथेविरोधात धडक कारवाई करत दोन बालविवाह यशस्वीपणे रोखले आहेत. 22 जून 2026 रोजी जमुना नगर परिसरातील तसेच 10 जुलै 2026 रोजी कांचन नगर येथील बिंदुबाई हॉलमध्ये होणारे बालविवाह पोलिसांच्या सतर्कतेमुळे थांबविण्यात आले.
या कारवाईनंतर शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालविवाह रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, भविष्यात बालविवाह करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कोणतीही पूर्वसूचना किंवा समुपदेशन न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, विवाहासाठी मुलीचे किमान वय 18 वर्षे आणि मुलाचे किमान वय 21 वर्षे असणे कायद्याने बंधनकारक आहे. याचे उल्लंघन झाल्यास बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.
या प्रकरणात केवळ मुला-मुलींचे पालकच नव्हे, तर विवाहाला संमती देणारे नातेवाईक, विवाह लावणारे पुरोहित किंवा काझी, मंडप डेकोरेटर्स, बँड पथक, वाजंत्री तसेच छायाचित्रकार यांनाही सहआरोपी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरी, एक लाख रुपयांपर्यंत दंड, तसेच संबंधित व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.
शनिपेठ पोलीस ठाण्याचे पथक अशा घटनांवर 24 तास लक्ष ठेवून असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक कटारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम बोरसे, योगेश जाधव, विजय सखैरे, अजय निकम, अनिल साळुखे तसेच पोलीस कर्मचारी अमोल वंजारी, पराग दुसाने, निलेश घुगे, नवजित चौधरी, संभाजी पाटील आणि गणेश ढाकणे यांनी सहभाग घेतला.




