खान्देशगुन्हेजळगांव

पाळधी-तरसोद बायपास रस्ता खचल्याची राज्य सरकारकडून गंभीर दखल; चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा, पालकमंत्र्यांसह गिरीश महाजन यांनी केली पाहणी

पाळधी-तरसोद बायपास रस्ता खचल्याची राज्य सरकारकडून गंभीर दखल; चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा, पालकमंत्र्यांसह गिरीश महाजन यांनी केली पाहणी

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पाळधी-तरसोद बायपास मार्गावर मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याची गंभीर घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. या घटनेनंतर मंत्री आणि अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असून, प्राथमिक निरीक्षणातच या रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

यापूर्वीही या महामार्गाच्या प्रकल्पाच्या कामाबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर यात दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संयुक्तपणे घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, लालचंद पाटील, पिंटू पाटील तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या आणि बॅरिकेड्स लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच खचलेल्या भागाची त्वरित दुरुस्ती करणे, रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करणे आणि संपूर्ण प्रकल्पाचे तांत्रिक लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे कडक निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button