
सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिनी तिरंगा मोटारसायकल रॅली
जळगाव | प्रतिनिधी — भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे यंदाही पारंपरिक पद्धतीने **‘राष्ट्रीय एकात्मता तिरंगा मोटारसायकल रॅली’**चे आयोजन करण्यात आले. १९९७ पासून सुरू असलेल्या या उपक्रमाचे यंदाचे हे आयोजन राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे ठरले.
सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते शुभारंभ
रॅलीचा शुभारंभ भिलपुरा येथील इमाम अहमद रझा चौकातून सकाळी १०.३० वाजता करण्यात आला. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मीय धर्मगुरूंनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली. यावेळी विघ्नहर्ता गणेश मंदिराचे पुजारी देवीलालजी व्यास, शनी मंदिराचे पंडित प्रभूजी महाराज, पंडित लक्ष्मण भगत, मुस्लिम धर्मगुरू असलम बाबा अशरफी, गुरुद्वारा सिंग सभा येथील ज्ञानी रविंदर सिंगजी, सेंट फ्रान्सिस डी सेल्स चर्चचे फादर मुक्ती तसेच बौद्ध धर्मगुरू डॉ. एन. आनंदा महाथेरो यांची उपस्थिती होती.
हातात तिरंगा, घोषणांनी दुमदुमले शहर
रॅलीत सहभागी युवकांनी हातात राष्ट्रध्वज तिरंगा घेतला होता. भिलपुरा येथून सुरू झालेली रॅली घाणेकर चौक, टॉवर चौक, नेहरू चौक, कोर्ट चौक मार्गे स्वातंत्र्य चौकात पोहोचली. यावेळी ‘हिंदुस्थान झिंदाबाद’, ‘हम सब एक हैं’, ‘जय हिंद, जय भारत’ तसेच स्वातंत्र्य दिनाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
राष्ट्रगीताने सांगता
सकाळी ११.३० वाजता स्वातंत्र्य चौकात रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. रॅलीचे नेतृत्व सै. अयाज अली नियाज अली यांनी केले.
रॅलीमध्ये सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनचे सै. अयाज अली नियाज अली, हाजी शेख सलीमउद्दीन, हाजी शकूर बादशहा, सय्यद उमर, कामिल खान, काशिफ टेलर, अमान बिलाल, शफी ठेकेदार, इलियास नुरी, झुबेर रंगरेज, रईस रऊफ, रहीम कुरेशी, शेख सलमान, शाहरुख कुरेशी, अकबर इब्राहिम, नितीन शिंपी, अयान नवाब, नाझिम शेख, योगेश मराठे, रफिक रहेमान, गुड्डू शब्बीर, मोहसीन कुरेशी, मुझफ्फर मास्टर, शुजात अली, अहेसान अली यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व युवक सहभागी झाले.





