खान्देशगुन्हेजळगांव

सराफा दुकानातील सोन्याची चोरी उघड; फरार आरोपी अकोल्यातून जेरबंद

सराफा दुकानातील सोन्याची चोरी उघड; फरार आरोपी अकोल्यातून जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ४७.४८ ग्रॅम सोन्यासह ४ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव : सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याचा ऐवज लंपास करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला शहरातून ताब्यात घेतले. आरोपीकडून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील एकूण ४७.४८ ग्रॅम सोन्याचा, अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा शोध

भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १२९/२०२६ आणि बोदवड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १२८/२०२६ या दोन्ही प्रकरणांत मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८, रा. पापा नगर, खडका रोड, इरणी वस्ती, भुसावळ) हा आरोपी फरार होता.

आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रयत्नशील होते. दरम्यान, आरोपी अकोला शहर परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने अकोला येथे जाऊन गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.

दोन गुन्ह्यांतील सोन्याचा ऐवज जप्त

आरोपीची चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीनुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील ३२.४०० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, अंदाजे ३ लाख २० हजार रुपये किमतीची, जप्त करण्यात आली.

तसेच बोदवड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता आरोपीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार १५.०८ ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग, अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची, पोलिसांनी हस्तगत केली.

दोन्ही कारवायांमध्ये एकूण ४७.४८ ग्रॅम सोन्याचा, अंदाजे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोहेकॉ गोपाळ गव्हाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, पोहेकॉ संदिप चव्हाण, चालक पोलीस कॉन्स्टेबल रिजवान शेख तसेच तांत्रिक मदत करणारे पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील व मिलिंद जाधव सहभागी झाले.

अटक आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोहेकॉ विकास यशवंत बाविस्कर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button