
तब्बल अडीच कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक
जळगावातील सराफाची पश्चिम बंगालमधील दोघांकडून फसवणूक; १.७५ किलो सोन्याचे दागिने घेऊन परत केले नाहीत
जळगाव : शहरातील शनीपेठ परिसरातील सराफा व्यावसायिकाची पश्चिम बंगालमधील दोघांनी तब्बल २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑक्टोबर २०२५ ते ३० मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वास संपादन करून घेतले १.७५ किलो सोने
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शनीपेठ, शनी मंदिरामागे असलेल्या आयुष ज्वेलर्स या सोनाराच्या दुकानातील व्यावसायिक नबाबकुमार गौरहारी धारा (वय ४१) यांच्याशी आरोपींनी संपर्क साधला.
पश्चिम बंगालमधील विद्युत निरोध बाग (वय ३१) आणि राजू बिपीन चौधरी यांनी व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी दुकानातून एकूण १,७५५.३४० ग्रॅम म्हणजे सुमारे १.७५ किलो २२ कॅरेट शुद्ध सोन्याचे तयार दागिने घेतले. या दागिन्यांची त्यावेळच्या बाजारभावानुसार किंमत २ कोटी ४५ लाख ७४ हजार ७६० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
२४ कॅरेट सोन्याची लगड देण्याचे आश्वासन
आरोपींनी घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात २४ कॅरेट शुद्ध सोन्याची लगड अथवा रोख रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दागिने घेऊन गेल्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे सोन्याची लगड किंवा रक्कम परत केली नाही.
वारंवार मागणी करूनही आरोपींनी टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफ व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली.
शनीपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) आणि ३१६ (४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेतील आरोपी पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर करीत असून, प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.




