
कत्तलीसाठी नेले जाणारे चार गोवंश पोलिसांनी वाचवले
उमाळा रोडवर छोटा हत्ती वाहन पकडले; १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी

नशिराबाद, प्रतिनिधी : कत्तलीच्या उद्देशाने चार गोवंशांना दाटीवाटीने कोंबून निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या चार जणांविरुद्ध नशिराबाद पोलिसांनी कारवाई केली. उमाळा रोडवर गस्ती दरम्यान संशयित छोटा हत्ती वाहन अडवून पोलिसांनी चार जिवंत गोवंशांची सुटका केली. या कारवाईत चार गोवंशांसह छोटा हत्ती वाहन असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना न्यायालयाने ८ ऑक्टोबरपर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
६ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्याचे पथक उमाळा रोड परिसरात गस्तीवर होते. यावेळी श्रीराम कंपनीच्या पुढील रस्त्यावर एमएच ०४ जीआर ६२०३ क्रमांकाचे छोटा हत्ती वाहन संशयास्पदरीत्या जाताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी वाहन थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता वाहनामध्ये चार गोवंश दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळले.
जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. तसेच दाटीवाटीने कोंबल्यामुळे त्यांना इजा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. वाहनचालकाकडे गोवंशांच्या वाहतुकीसाठी आवश्यक अधिकृत परवानाही आढळून आला नाही.
पोलिसांनी वाहनातील व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांनी गोवंश नेरी गावच्या बाजारातून खरेदी केल्याचे सांगितले. हे गोवंश नशिराबाद येथे कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती चौकशीत समोर आली.
या प्रकरणात शेख रज्जाक शेख कादर, सादीक शेख कादर, शेख अन्सार शेख कादर आणि सुफियान शेख सादीक, सर्व रा. नशिराबाद, यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान एका काळ्या रंगाच्या गोवंशाची अंदाजे किंमत १० हजार रुपये, तीन तपकिरी रंगाच्या गोवंशांची प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे ३० हजार रुपये आणि छोटा हत्ती वाहनाची अंदाजे किंमत १ लाख रुपये असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस हवालदार ३४६ भरत शशिकांत बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५अ, ५ब, ९, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(d), ११(१)(h), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ तसेच केंद्रीय मोटर वाहन नियम १२५(ई) सह मोटार वाहन कायदा कलम १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार १९ चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ३४६ भरत बाविस्कर आणि पोलीस कॉन्स्टेबल ४७६ पंकज सोनवणे यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल २९१५ गुणवंत देशमुख करीत आहेत.




