
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष; जळगावच्या वकिलाची ७ लाख ६० हजारांची फसवणूक, पुण्याच्या दोघांवर गुन्हा
जळगाव: रशियन ऑईल कंपनीचे शेअर्स आणि बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जळगावातील ॲड. विजय बाबुलाल दाणेज यांची ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी पुण्यातील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कात्रज (पुणे) येथील विनोद निमानाथ सोनार आणि आनंद परदेशी यांनी २०१६ मध्ये दाणेज यांना रशियन कंपनीच्या बनावट योजनांची माहिती देऊन विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून बिटकॉईनसाठी ७ लाख १० हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. काही काळ आभासी नफा दाखवल्यानंतर प्रत्यक्ष पैसे देणे बंद केले. वकिलाने पैशांची मागणी केली असता त्यांना जीवे मारण्याची व एन्काऊंटरची धमकी देण्यात आली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ॲड. दाणेज यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर पुढील तपास करत आहेत.





