
सुप्रीम कॉलनीत वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान दगडफेक
एमआयडीसी पोलीस व आरसीपी पथकाची घटनास्थळी धाव; परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात
जळगाव | प्रतिनिधी :
जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात किराणा दुकानासमोर वाळू टाकण्याच्या अत्यंत किरकोळ कारणावरून दोन गटांत तीव्र वाद होऊन दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी व अतिरिक्त बंदोबस्ताने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
किरकोळ वादाचे थेट दगडफेकीत रूपांतर
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुप्रीम कॉलनीतील एका किराणा दुकानासमोर वाळू टाकण्यात आली होती. या वाळूच्या ढिगाऱ्यावरून दुकान मालकाच्या मुलाचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. या वादाचे पर्यवसान काही वेळातच मोठ्या भांडणात झाले. त्यानंतर काही तरुणांनी एकत्र येत समोरील गल्लीत थेट दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटातील काही व्यक्तींनीही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आरसीपी पथक घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे (SDPO) ‘आरसीपी’ (RCP) विशेष पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कठोर भूमिका घेत जमाव पांगवला आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आणली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि इतर उपलब्ध माध्यमांची बारकाईने पडताळणी करण्यात येत आहे. या दगडफेकीच्या घटनेत नेमका कोणाचा सहभाग होता, याचा शोध घेऊन दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
“सुप्रीम कॉलनी परिसरातील परिस्थिती आता पूर्णपणे शांत व नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत. परिसरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे.”
— पोलीस प्रशासन, जळगाव





