

सुलेमान पठाण प्रकरणात न्यायासाठी आई-वडिलांची अबू आसीम आझमी यांच्याकडे धाव
मुंबई | प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील बेटावद येथील मरहूम सुलेमान पठाण यांच्या मृत्यूच्या प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांच्या आई-वडिलांनी मुंबई येथे समाजवादी पक्षाचे नेते अबू आसीम आझमी यांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी आतापर्यंत झालेल्या पोलिस कारवाईची माहिती देत न्यायासाठी सुरू असलेल्या संघर्षाची व्यथा त्यांच्यासमोर मांडली.
आरोपींना जामीन; कुटुंबाचा न्यायासाठी लढा
सुलेमान पठाण यांच्या मृत्यूच्या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, अटक झाल्यानंतर काही दिवसांतच संबंधितांना जामीन मिळाल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजी आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधात योग्य कारवाई व्हावी आणि न्याय मिळावा, अशी मागणी सुलेमान यांच्या आई-वडिलांनी केली.
अबू आसीम आझमींकडून कायदेशीर मदतीचे आश्वासन
कुटुंबीयांची व्यथा ऐकल्यानंतर अबू आसीम आझमी यांनी सुलेमान पठाण यांच्या कुटुंबीयांना न्यायासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. संपूर्ण प्रकरणाबाबत आपल्या वकिलांशी चर्चा करून कुटुंबाला शक्य ती सर्व कायदेशीर मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, घटनेनंतर यापूर्वीही अबू आसीम आझमी यांनी बेटावद येथे जाऊन सुलेमान पठाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती आणि त्यावेळीही मदतीचे आश्वासन दिले होते.
“न्यायाची लढाई थांबणार नाही”
वर्ष उलटले तरी मुलाच्या मृत्यूचे दुःख आणि न्यायाची अपेक्षा कुटुंबीयांच्या मनात कायम आहे. सुलेमान पठाण हे केवळ एक नाव नसून एका कुटुंबाचा आधार होते. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरूच ठेवण्याचा निर्धार कुटुंबीयांनी व्यक्त केला. या भेटीवेळी सुलेमान पठाण यांचे आई-वडील, शाहरुख भाई, अशफाक पटेल (जिल्हाध्यक्ष), गुड्डू भाई काकर (उत्तर महाराष्ट्र निरीक्षक), इमरान खान (युवा आघाडी) आणि अफजल पठाण (स्टेट कमिटी) उपस्थित होते.




