
रावेर बसस्थानकाजवळ गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक
२६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
रावेर | प्रतिनिधी
रावेर शहरातील बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या छोरीया मार्केट परिसरात गावठी कट्टा घेऊन संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तरुणाला रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (DB Team) रंगेहाथ अटक केली. कृष्णा दतू पाटील (वय २०, रा. रोकडा हनुमान मंदिर नगर, रावेर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि १ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला गुरुवारी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रावेर बसस्थानकाच्या मागे छोरीया मार्केटजवळ एक तरुण बेकायदेशीर शस्त्र बाळगून संशयास्पदरीत्या फिरत आहे. माहितीची खातरजमा होताच पोलीस पथकाने तातडीने संबंधित परिसरात धाव घेऊन सापळा रचला.
यावेळी छोरीया मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर राखाडी रंगाचा फुल शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स घातलेला एक तरुण पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या पथकाने त्याला तत्काळ ताब्यात घेऊन पंचांसमक्ष अंगझडती घेतली.
संशयिताच्या अंगझडतीदरम्यान त्याच्याकडे लोखंडी धातूचा तपकिरी रंगाचा देशी बनावटीचा एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून कृष्णा पाटील याला बेड्या ठोकल्या.
या प्रकरणी पोलीस अंमलदार सुकेश तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




