इतर

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; सरपंचाला अटक

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; सरपंचाला अटक

यावल पोलिसांची कारवाई; गावठी पिस्तूल, मॅगझीन व जिवंत काडतूस जप्त

यावल : डांभुर्णी येथे भर चौकात गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचाला यावल पोलिसांनी अटक केली आहे. विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७, रा. कोळन्हावी, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

डांभुर्णीच्या चौकात हवेत फायर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ वाजता विकास उर्फ गोटू सोळंके हा डांभुर्णी गावातील चौकात आला. किनगाव रोडलगत असलेल्या शिवसम्राट सोयाबीन बिर्याणी दुकानाजवळ त्याने गावठी पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याची माहिती यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धारबळे, पोउनि मैनुद्दीन सय्यद यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता नुकत्याच फायर केलेल्या राऊंडची रिकामी पुंगळी आढळून आली. परिसरातील दुकानदारांकडे चौकशी केली असता विकास सोळंके यानेच गोळीबार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे जप्त

घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रिकामी पुंगळी तसेच इतर भौतिक पुरावे जप्त केले.

गोळीबार केल्यानंतर आरोपी जळगावच्या दिशेने निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर यावल पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.

जळगावातून ताब्यात

पोउनि अनिल महाजन, पोलीस कर्मचारी सचिन पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि सोपान गोरे यांच्या पथकाने संयुक्त शोधमोहीम राबवली. रात्री सुमारे १ वाजता कालिका माता मंदिर परिसर, जळगाव येथून विकास उर्फ गोटू सोळंके याला ताब्यात घेण्यात आले.

त्याला यावल पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने गोळीबार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार?

पोलिसांच्या चौकशीत आरोपी कोळन्हावी ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच असल्याचे समोर आले. त्याचे कोळन्हावी परिसरात हॉटेल, बीअर बार व परमिट रूम असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डांभुर्णी गावातील काही मुले त्याच्या हॉटेलमध्ये येऊन मोबाईलवर व्हिडिओ काढून त्रास देत होती. याच कारणावरून २६ ऑगस्ट रोजी त्यांच्यासोबत वाद झाला होता. या वादातून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या दिवशी डांभुर्णी येथे येऊन हवेत गोळीबार केल्याचे आरोपीने सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

शेतात लपविलेले पिस्तूल हस्तगत

गोळीबारासाठी वापरलेले हत्यार कोळन्हावी गावाच्या शिवारातील आदर्श हॉटेलजवळील स्वतःच्या शेतात लपवून ठेवल्याची माहिती आरोपीने दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत राऊंड हस्तगत केला.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५ तसेच भारतीय हत्यार कायद्यातील कलम ३(१), २५(१-ब), ५(१), २५(१)(अ), २५(९), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि मैनुद्दीन सय्यद करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button