अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १२५ पोलीस पाटलांची कार्यशाळा

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १२५ पोलीस पाटलांची कार्यशाळा
नागरी हक्क संरक्षण विभागाचा पुढाकार; कायद्याची जनजागृती आणि पीडितांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन
जळगाव : नागरी हक्क संरक्षण विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या वतीने अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ (सुधारित २०१५) च्या प्रभावी अंमलबजावणीसह कायद्याची जनजागृती करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील १२५ पोलीस पाटलांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा सुरभी लॉन्स, एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर, अजिंठा चौफुली येथे पार पडली.
मा. अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत पोलीस पाटलांना कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तज्ज्ञांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन
कार्यशाळेत पोलीस उपअधीक्षक पंडीत सोनवणे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बी. यू. पाटील, समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वय अधिकारी महेंद्र पाटील, बार्टीचे प्रकल्प अधिकारी अर्जुन गायकवाड आणि सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक पी. टी. सपकाळ यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी, त्याची प्रभावी अंमलबजावणी, पीडितांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत, समाजकल्याण विभागाच्या विविध योजना, नागरी हक्क संरक्षण विभागाची कार्यपद्धती तसेच महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदींवर सविस्तर माहिती देण्यात आली.
१२५ पोलीस पाटलांचा सहभाग
या कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील १२५ पोलीस पाटलांनी सहभाग घेतला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस उपअधीक्षक पंडीत सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक रितेश राऊत, सहायक फौजदार प्रविण ढाके, राजेंद्र पवार तसेच नागरी हक्क संरक्षण पथक, जळगाव आणि नाशिक येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





