गुन्हेअपघातखान्देशजळगांव

यावल पोलीस ठाणे हद्दीत २४ तासांत तिघांचा मृत्यू; दोन गळफास, एक विहिरीत आढळला

यावल पोलीस ठाणे हद्दीत २४ तासांत तिघांचा मृत्यू; दोन गळफास, एक विहिरीत आढळला

वेगवेगळ्या घटनांनी परिसरात खळबळ; तिन्ही प्रकरणांत अकस्मात मृत्यूची नोंद

यावल : यावल पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवघ्या २४ तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यातील दोन तरुणांचा मृत्यू गळफासाच्या घटनेत झाला, तर दहिगाव येथील एका व्यक्तीचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. या तिन्ही घटनांप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

डांगपुरा परिसरात ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

यावल शहरातील चोपडा रस्त्यावरील इंदिरा गांधी हायस्कूललगत डांगपुरा परिसरात शेख मुजाहिद शेख मुन्शी मोमीन (वय ३९) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री निदर्शनास आली. त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

सांगवी खुर्द येथील ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दुसऱ्या घटनेत सांगवी खुर्द, ता. यावल येथील प्रमोद श्रावण गोसावी (वय ४१) यांचा मृत्यू झाला. प्रकृतीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांनाही यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

दहिगाव येथील व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळला

तिसऱ्या घटनेत दहिगाव, ता. यावल येथील नरेंद्र उर्फ ज्ञानबा यादव पाटील (वय ३६) हे घरातून बेपत्ता झाले होते. सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला.

या तिन्ही घटनांमुळे यावल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी तिन्ही प्रकरणांत अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित तडवी, पोलीस हवालदार उमेश महाजन आणि पोलीस नाईक वसीम तडवी या घटनांचा तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button