

एकाच ठिकाणी ३० गडकिल्ले! शनीपेठ मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ऐतिहासिक दुर्गजागर
दुर्गसंवर्धनाचा संदेश देणार मंडळ : अध्यक्षपदी प्रशांत पाटील
जळगाव, जळगाव शहरातील मानाचे आणि शिस्तबद्धतेसाठी प्रसिद्ध असलेल्या शनीपेठ मित्र मंडळाचे यंदाचे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. मंडळाच्या ५० व्या वर्षाचे औचित्य साधून यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांसाठी एका भव्य आणि ऐतिहासिक देखाव्याची पर्वणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३० गडकिल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन हे यंदाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
शिवरायांचा जाज्वल्य इतिहास, त्यांचे अतुलनीय शौर्य, दूरदृष्टी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेले गडकिल्ले नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने मंडळाने ही अनोखी संकल्पना साकारली आहे. गणेशोत्सवाच्या काळात हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार असून, जळगावकरांना एकाच ठिकाणी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घडणार आहे.
दुर्गसंवर्धनासोबत स्वच्छतेचा संदेश
केवळ ऐतिहासिक देखावा साकारण्यापुरती मंडळाची भूमिका मर्यादित नसून, गडकिल्ल्यांचे संवर्धन, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि दुर्गभ्रमंतीदरम्यान स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. युवकांनी पुढाकार घेऊन दुर्गसंवर्धनाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहनही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
*नूतन कार्यकारणी जाहीर*
ऐतिहासिक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शनीपेठ मित्र मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात अध्यक्ष प्रशांत मधुकर पाटील, उपाध्यक्ष शांताराम शंकर पाटील, प्रभाकर नारायण महाले, सचिव : संजय लक्ष्मण देवरे, कार्याध्यक्ष अनिल अमृत वाणी, मुकुंदा भागवत सोनवणे, उत्सव समिती प्रमुख जगदीश भास्कर नेवे, मिरवणूक प्रमुख देविदास रमेश जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
जनजागृतीपर देखाव्यांची परंपरा
शनीपेठ मित्र मंडळाने आजवर गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक जनजागृती करणारे सजीव देखावे साकारले आहेत. सामाजिक आणि धार्मिक विषयांसोबतच मंडळाने खाटू श्याम बाबा, कृष्ण जन्म यांसारख्या विविध आकर्षक आरासही साकारल्या आहेत. मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग हे देखील मंडळाचे विशेष वैशिष्ट्य मानले जाते.
जल्लोषात नागरिकांची मोठी गर्दी
यंदाच्या गणेशोत्सवासाठी बाप्पाचे आगमनही मोठ्या जल्लोषात करण्यात आले असून, या सोहळ्याला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आता सुवर्ण महोत्सवी वर्षातील ३० गडकिल्ल्यांचा भव्य देखावा पाहण्यासाठी जळगावकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
“चला युवकांनो, पुढे या; दुर्गसंवर्धनात हातभार लावा!” या संदेशातून शनीपेठ मित्र मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला इतिहास, संस्कृती आणि सामाजिक जनजागृतीची अनोखी जोड दिली आहे.




