खान्देशगुन्हेजळगांव

शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचे अमिष दाखवून ५३ वर्षीय महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचे अमिष दाखवून ५३ वर्षीय महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक

बांभोरी येथील पती-पत्नीसह आईविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास त्यावर भरघोस परतावा देण्याचे अमिष दाखवून एका महिला वकिलाची तब्बल ७ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील रामदास कॉलनी परिसरात राहणाऱ्या महिला वकिलाला जाळ्यात ओढून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल भास्कर पाटील, त्याची पत्नी जयश्री अतुल पाटील आणि आई सुरेखा भास्कर पाटील उर्फ प्रीती दिलीप पाटील (सर्व रा. बांभोरी, ता. धरणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

विश्वास संपादन करून जाळ्यात ओढले रामदास कॉलनीतील रहिवासी असलेल्या ॲड. तोषिता ज्ञानेश्वर भिरूड (वय ५३) यांची संशयितांशी गावातील जुनी ओळख होती. जानेवारी २०२५ मध्ये प्रीती पाटील या ॲड. तोषिता भिरूड यांच्या घरी आल्या होत्या. संभाषणादरम्यान त्यांनी “माझा मुलगा अतुल आणि सून जयश्री शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा कमावतात, त्यांनी अनेक लोकांना फायदा करून दिला आहे,” असे सांगत भिरूड यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अतुल आणि जयश्री या दोघांनीही ॲड. भिरूड यांना गुंतवणुकीबाबत माहिती देऊन आकर्षित केले.

सुरवातीला परतावा देऊन जिंकला विश्वास, नंतर ७ लाखांचा गंडा संशयितांच्या सांगण्यावरून ॲड. तोषिता भिरूड यांनी ३० एप्रिल २०२५ रोजी अतुल पाटील याच्या बँक खात्यावर सुरुवातीला गुंतवणुकीसाठी १ लाख ५० हजार रुपये पाठवले. विश्वास बसावा म्हणून संशयितांनी काही दिवस त्यांना नियमित परतावा (रिटर्न्स) देखील दिला. या परताव्यावर विश्वास ठेवून ॲड. भिरूड यांनी वेळोवेळी आणखी रक्कम गुंतवली. मात्र, एकूण ७ लाख रुपये उकळल्यानंतर संशयितांनी परतावा देणे बंद केले आणि मूळ रक्कमही परत केली नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ॲड. तोषिता भिरूड यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसांनी संशयित अतुल पाटील, त्याची पत्नी जयश्री पाटील आणि आई प्रीती पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button