खान्देशजळगांवराजकीयशासकीयसामाजिक

फैजपूर शहरातील विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

फैजपूर शहरातील विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून विविध कामांची स्वतंत्र तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी

फैजपूर, प्रतिनिधी : फैजपूर शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या गुणवत्ता, कामाची पद्धत आणि खर्चाबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण होत असल्याचा दावा करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा (टायगर) राजेंद्र चौधरी यांनी फैजपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन या कामांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.

विविध कामांबाबत प्रश्न उपस्थित
शहरात नभो गार्डन, जलतरण तलाव, गटारी, रस्ते तसेच अन्य नागरी विकासकामे सुरू आहेत. या कामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता, कामाचे प्रमाण, मंजूर अंदाजपत्रकानुसार कामाची अंमलबजावणी तसेच बिल आणि मोजमाप पुस्तिकेतील नोंदी याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

स्थळ पाहणीसह तांत्रिक चौकशीची मागणी
संबंधित सर्व विकासकामांची स्वतंत्र तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यासोबतच मंजूर अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया, वर्क ऑर्डर, मोजमाप पुस्तिका, वापरण्यात आलेले साहित्य, कामाची गुणवत्ता आणि संबंधित देयकांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अनियमितता आढळल्यास जबाबदारी निश्चित करा
चौकशीदरम्यान अनियमितता, निकृष्ट दर्जाचे साहित्य, मंजूर अंदाजपत्रकापेक्षा वेगळ्या पद्धतीने काम, चुकीच्या अथवा बोगस नोंदी किंवा शासनाच्या निधीचा गैरवापर आढळल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकशीपर्यंत कामांना स्थगितीची मागणी
गंभीर स्वरूपाच्या अनियमितता आढळणाऱ्या कामांबाबत चौकशी पूर्ण होईपर्यंत आवश्यकतेनुसार तात्पुरती स्थगिती देण्यात यावी. संबंधित ठेकेदारांना काम पुढे सुरू करण्यास प्रतिबंध करावा आणि दोष सिद्ध झाल्यास नियमानुसार कारवाई करून शासनाच्या झालेल्या नुकसानीची वसुली करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

कार्यवाहीची लेखी माहिती द्यावी
या निवेदनावर प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती अर्जदारांना देण्यात यावी, अशी विनंती कृष्णा (टायगर) राजेंद्र चौधरी यांनी केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जळगाव यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.

यांची उपस्थिती
निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा (टायगर) चौधरी, उपशहराध्यक्ष नदीम तडवी, उपशहराध्यक्ष वेदांत कुलकर्णी, उपशहराध्यक्ष दानिश भाई, शहर संघटक पवन परदेशी तसेच पंकज मिस्त्री, भूषण मिस्त्री, दीपक वाघोदे, बंटी सोनवणे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button