
एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
अनमॅपिंग मतदारांच्या नोंदी व लॉजिकल डिस्क्रेपन्सी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे नागरिकांना आवाहन
जळगाव, प्रतिनिधी : विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआरच्या फेज-१ मध्ये अनमॅपिंग झालेल्या मतदारांच्या नोंदी तसेच लॉजिकल डिस्क्रेपन्सी असलेल्या नोंदींची पडताळणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित नागरिकांशी बीएलओ किंवा एईआरओ पथकांकडून त्यांच्या घरी जाऊन संपर्क साधण्यात येणार आहे.
अनमॅपिंग झालेल्या मतदारांच्या नोंदींचे मॅपिंग करण्यासाठी तसेच लॉजिकल डिस्क्रेपन्सी दूर करण्यासाठी संबंधित नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर नोंदीचे मॅपिंग अथवा संबंधित विसंगतीचे निराकरण झाल्यास स्वतंत्र सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता राहणार नाही.
दरम्यान, प्रारूप मतदार यादीमध्ये एखाद्या पात्र नागरिकाचे नाव नसल्यास संबंधित नागरिकाला नमुना क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
नागरिकांनी एसआयआर प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून बीएलओ किंवा एईआरओ पथकांकडून मागविण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.




