
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
महानगरपालिका उपायुक्त निर्मला गायकवाड यांच्या हस्ते तीन हजार कागदी पिशव्यांचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी : गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेअंतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तीन हजार पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. वाघ नगर बस स्टॉपजवळील आठवडे बाजारात मंगळवारी हा उपक्रम राबविण्यात आला. जळगाव महानगरपालिकेच्या उपायुक्त निर्मला गायकवाड यांच्या हस्ते नागरिकांना कागदी पिशव्यांचे वितरण करून उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या कागदी पिशव्या बाजारातील नागरिक व व्यापाऱ्यांना वितरित करून ‘प्लास्टिकला नकार, पर्यावरणाला स्वीकार’ हा संदेश दिला. प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करत नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात कागदी व कापडी पिशव्यांसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.
पर्यावरण संवर्धन हा केवळ शालेय अभ्यासाचा विषय न राहता तो प्रत्यक्ष कृतीत उतरावा, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी कागदी पिशव्या तयार करून त्यांचे सार्वजनिक ठिकाणी वाटप केले. या उपक्रमातून पुनर्वापर, प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिक व व्यापाऱ्यांनीही उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अनुभूतीचे अध्यक्ष अतुल जैन व प्राचार्या रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली, गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेचे समन्वयक राजेंद्र बावस्कर यांच्या नियोजनातून हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमाची संकल्पना व निर्मिती शिक्षिका पल्लवी साळुंके यांची होती.
उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करून त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून समाजासमोर मांडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र बावस्कर, महानगरपालिकेचे शहर समन्वयक राजेश पाटील, शिक्षिका संगीता पाटील, हर्षा वाणी यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.




