खान्देशजळगांवराजकीयशासकीयसामाजिक

जळगावातील अंधार दूर करण्यासाठी आमदार भोळेंचा पुढाकार; २०० स्ट्रीट लाइट बसवणार

नवरात्र-दिवाळीपूर्वी स्वखर्चातून प्रकाशव्यवस्था; मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले प्रश्न

जळगावातील अंधार दूर करण्यासाठी आमदार भोळेंचा पुढाकार; २०० स्ट्रीट लाइट बसवणार

नवरात्र-दिवाळीपूर्वी स्वखर्चातून प्रकाशव्यवस्था; मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित केले प्रश्न

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या समस्येबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी पुढाकार घेतला आहे. नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या काळात नागरिकांना अंधाराचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी त्यांनी स्वखर्चातून २०० नवीन पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना पत्र देत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

कर वसुली एवढीच मनपाची जबाबदारी आहे का?

शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र, पथदिव्यांच्या समस्येकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा प्रश्न आमदार भोळे यांनी उपस्थित केला. शासनाने पथदिव्यांसाठी एजन्सी नियुक्त केली असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव महानगरपालिकेच्या महासभेत मंजूरही झाला आहे. तरीदेखील प्रत्यक्षात प्रभावी कार्यवाही झालेली नाही.

संबंधित एजन्सीच्या कामकाजाबाबत प्रशासनाला काही आक्षेप असतील, तर महासभेच्या ठरावाबाबत योग्य निर्णय घेऊन शासनाला कळवावे. मात्र, शहराच्या प्रकाशव्यवस्थेबाबत निर्णय घेण्यास विलंब करणे योग्य नाही. महानगरपालिकेने केवळ कर वसुलीपुरती जबाबदारी मर्यादित न ठेवता नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यासाठीही गांभीर्याने काम करावे, असे आमदार भोळे यांनी नमूद केले.

अंधार असलेल्या भागांचे सर्वेक्षण होणार

गणेशोत्सवाच्या काळातही आपण स्वखर्चातून शहरात १५० नवीन पथदिवे बसविले होते. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी २०० पथदिवे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार भोळे यांनी दिली. ज्या ठिकाणी हायमास्ट दिवे बंद आहेत किंवा सध्याच्या दिव्यांमधून पुरेसा प्रकाश मिळत नाही, अशा ठिकाणी नवीन पथदिवे बसविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

यासाठी विशेष पथक शहरातील विविध भागांची पाहणी करणार आहे. ज्या ठिकाणी अंधार असतो, अशा परिसरांची यादी तयार करून तेथे प्रकाशव्यवस्था सुधारण्यासाठी कार्यवाही केली जाईल.

अंधारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

पथदिव्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. नवरात्रोत्सव आणि दिवाळीदरम्यान बाजारपेठांसह सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढते. अशा वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था असणे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे, असे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

रस्त्यावरील खड्डा अंधारामुळे दिसला नसल्याने नुकतीच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटनाही समोर आली आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहरातील प्रकाशव्यवस्था सुरळीत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

— सुरेश भोळे, आमदार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button