
महापालिका महासभेतील ‘पिस्तूल’ प्रकरणाची चौकशी करा!
माहिती अधिकारातून नियम, सीसीटीव्ही फुटेज आणि कारवाईचा तपशील मागविला

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत एका नगरसेवकाच्या कमरेला पिस्तूल दिसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रकरणाची माहिती समोर आणण्यासाठी माहिती अधिकाराचा आधार घेण्यात आला आहे. अर्जदार हर्षल नरेंद्र कोरडे यांनी माहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ६(१) अंतर्गत महापालिका प्रशासनाकडे विविध मुद्द्यांवर माहिती मागविली आहे.
लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने महासभेत शस्त्र घेऊन प्रवेश करण्यासंबंधी लागू असलेले नियम, आदेश आणि परिपत्रकांच्या प्रमाणित प्रती देण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच संबंधित महासभेचे सीसीटीव्ही फुटेज आणि अधिकृत व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असून ते जतन केले आहे का, याची माहितीही मागविण्यात आली आहे.
या घटनेबाबत महापालिका प्रशासनाकडे कोणत्या तक्रारी प्राप्त झाल्या, चौकशीचे आदेश देण्यात आले का, चौकशी अहवाल तयार झाला आहे का आणि त्यानंतर कोणती कार्यवाही करण्यात आली, यासंबंधीच्या नोंदींच्या प्रती देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय सभागृहातील सुरक्षा तपासणीची जबाबदारी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यवाटपाच्या आदेशांची प्रतही अर्जदाराने मागितली आहे.
प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे आणि त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आला असल्यास त्याची प्रत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही अर्जात करण्यात आली आहे. मागितलेली माहिती निर्धारित मुदतीत देण्याची विनंती अर्जदार हर्षल कोरडे यांनी केली आहे.
महासभेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, शस्त्रांबाबतचे नियम आणि संबंधित प्रकरणात प्रशासनाने केलेली कार्यवाही याबाबतची अधिकृत माहिती समोर येण्याच्या दृष्टीने या माहिती अधिकार अर्जाला महत्त्व प्राप्त झाले आहे.




