
जळगावातील ५३० शिक्षकांच्या मान्यता रद्दचे आदेश; शालार्थ घोटाळ्यात मोठी कारवाई
१६० कोटींच्या कथित गैरव्यवहाराचे प्रकरण; उर्वरित मान्यता रद्दची प्रक्रियाही सुरू

जळगाव, प्रतिनिधी :
राज्यभर गाजत असलेल्या बोगस वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यात शिक्षण विभागाने कारवाईचा वेग वाढवला आहे. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार, जिल्ह्यातील ५३० शिक्षकांच्या बोगस वैयक्तिक मान्यता रद्द करण्याचे आदेश मंगळवारी (ता. २७) संबंधित संस्थांना देण्यास सुरुवात करण्यात आली.
या घोटाळ्यात शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. नाशिक विभागातील एकूण ८९३ प्रकरणांपैकी जळगाव जिल्ह्यातील ६५० शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्याचे आदेश विभागीय कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यापैकी माध्यमिक शिक्षण विभागाने आतापर्यंत ५३० मान्यता रद्द करण्यासंदर्भातील आदेश संबंधित संस्थांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उर्वरित आदेशही आगामी काळात जारी केले जाणार आहेत.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याबाबतची पत्रेही संस्थाचालक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे असल्याचे समोर आले असून, मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी किती शिक्षकांच्या मान्यता रद्द होतात, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.



