
भूकंपाच्या धक्क्यांनी घाबरू नका; सतर्क राहा, प्रशासन आपल्या पाठीशी – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सौम्य धक्के; जीवितहानी किंवा वित्तहानीची प्राथमिक माहिती नाही

अफवांवर विश्वास न ठेवता नुकसान झाल्यास प्रशासनाला कळविण्याचे आवाहन
जळगाव/पाळधी, प्रतिनिधी : भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती नाही, ही दिलासादायक बाब आहे. प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता ही शासन आणि प्रशासनासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत शासन आणि प्रशासन जिल्हावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी होती. या भूकंपाचे धक्के जळगावसह धुळे, नंदुरबार, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांतील काही भागांतही जाणवल्याची माहिती आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, जिल्ह्यात आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली नाही. परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संयम राखावा आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.
नुकसान झाल्यास तातडीने प्रशासनाला कळवा
जिल्ह्यात कुठेही घरांचे, इमारतींचे किंवा अन्य मालमत्तेचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तातडीने संबंधित तहसील कार्यालय, स्थानिक प्रशासन किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा. प्राप्त माहितीच्या आधारे परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता एकमेकांना सहकार्य करावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासन आणि प्रशासन सदैव तत्पर असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जिल्हावासीयांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.




