
गोगडी धरणात बोट उलटली; चार जण तासभर मृत्यूशी झुंजले!
पहूरच्या चार युवकांनी पाण्यात उडी घेत चौघांचे वाचविले प्राण; मोठी दुर्घटना टळली

पहूर (ता. जामनेर) : धरणाच्या शांत पाण्यात अचानक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. दुसऱ्या काठावर जाण्यासाठी बोटीतून निघालेल्या चार जणांवर धरणाच्या मध्यभागीच संकट कोसळले. बोट उलटल्याने दोन तरुणी, एक तरुण आणि बोटचालक पाण्यात अडकले. हाताशी आलेल्या बोटीचा आधार घेत चौघांनी तब्बल तासभर जीव वाचविण्यासाठी संघर्ष केला. त्यांचा मदतीसाठीचा आक्रोश ऐकून पहूरमधील चार धाडसी युवकांनी धरणात उड्या घेतल्या आणि चौघांनाही सुरक्षित बाहेर काढले. बुधवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास गोगडी धरणात हा थरार घडला.
खुशी लखन परदेशी (रा. डांभुर्णी) ही पळसखेडा (ता. सोयगाव) येथे नातेवाइकांकडे आली होती. बुधवारी ती अचल संजय कवाल आणि चुलतभाऊ अमोल रूमसिंग कवाल यांच्यासोबत गोगडी धरण परिसरातील शेतात गेली होती. तेथून धरणाच्या पलीकडील काठावर जाण्यासाठी त्यांनी बोटचालक आनंदा काशिनाथ भिल यांच्या बोटीचा आधार घेतला.
प्रवास सुरू असताना बोट धरणाच्या मध्यभागी पोहोचली आणि अचानक उलटली. क्षणार्धात चौघेही पाण्यात पडले. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी प्रसंगावधान राखत उलटलेल्या प्लास्टिकच्या बोटीला घट्ट पकडून ठेवले. पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण झाल्याने त्यांनी मोठमोठ्याने मदतीसाठी हाका मारण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून आसपासच्या शेतकऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली.
संकटसमयी युवकांची धाडसी कामगिरी
घटनेची माहिती मिळताच पहूर पेठचे सरपंच अब्बू तडवी, ग्रामविकास अधिकारी योगेश पालवे, माजी सभापती बाबुराव घोंगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलिस कर्मचारी राहुल पाटील, गजानन पाटील आणि वैभव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पाण्यात अडकलेल्या चौघांना वाचविण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू झाले. सरपंच अब्बू तडवी यांनी पोहण्यात तरबेज असलेल्या शरीफ बादल तडवी, इरफान शफीक तडवी, विजय भोई आणि अशोक पवार यांना मदतीसाठी पाचारण केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या चौघांनी जीवाची पर्वा न करता धरणात उड्या घेतल्या. पाण्याच्या मध्यभागी पोहोचून त्यांनी मोठ्या प्रयत्नाने चौघांना किनाऱ्यावर आणले. या धाडसी बचावकार्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली.
तासभराचा संघर्ष अन् अखेर सुटकेचा निःश्वास
धरणाच्या मध्यभागी मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या चौघांसाठी प्रत्येक क्षण कसोटीचा ठरत होता. तब्बल तासभर त्यांनी पाण्यात स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी पहूरच्या चार युवकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे चारही जणांना नवे जीवन मिळाले. बचावकार्य यशस्वी होताच घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती,’ अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ग्रामविकास अधिकारी योगेश पालवे, माजी सभापती बाबुराव घोंगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी आवश्यक कार्यवाही केली.



