
बिल्दी धरणाजवळ अपघातात शिवसेना पदाधिकाऱ्याचा मृत्यू
कार झाडावर आदळली; पाचोऱ्यात शोककळा

पाचोरा (प्रतिनिधी) : जळगावहून पाचोऱ्याकडे परतत असताना बिल्दी धरणाजवळ झालेल्या भीषण कार अपघातात शिवसेनेचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश प्रल्हाद काळे (वय ५८) यांचा मृत्यू झाला. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे पाचोरा शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
समर्थ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि आर. के. जिमचे संचालक असलेले राजेश काळे हे स्वामी विंग, रिंग रोड, पाचोरा येथील रहिवासी होते. ते २८ नोव्हेंबर रोजी आपल्या एमएच १९, ईजी २२११ क्रमांकाच्या कारने जळगावहून पाचोऱ्याकडे येत होते. बिल्दी धरणाजवळ पोहोचले असता कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळले.
या अपघातात काळे यांच्या डोक्याला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे पाचोरा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच हिरिरीने सहभागी होणाऱ्या काळे यांच्या निधनाने पाचोऱ्यातील सामाजिक क्षेत्राला धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि दोन भाऊ असा परिवार आहे.




