चाळीसगाव:- चाळीसगाव येथील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा त्यांच्या कार्यालयात बसलेले असतांना कारमध्ये येवून गोळीबार करून खून करण्यात आला होता. बाळू मोरे यांच्या संपर्क कार्यालयातील संजय बैसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उद्देश उर्फ गुड्डू शिंदे, सॅम चव्हाण, सचिन गायकवाड,अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख, भूपेश सोनवणे, सुमित भोसले, संतोष निकुंभ उर्फ संता पेहलवान या आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सात आरोपी पैकी अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख व सचिन गायकवाड या दोन आरोपींना एलसीबीचा पथकाने ताब्यात घेतले आहे.
चाळीसगाव शहर पो.स्टे. येथे दाखल गुन्ह्यातील आरोपीतांनी चाळीसगाव शहरातील नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांचेवर दि.७ रोजी गोळीबार करुन त्यांचा खून करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी हे फायरिंग करुन पळून गेले होते. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसन नजनपाटील यांना सदर गुन्हयांतील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले होते.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना दि.११ रोजी गोपनिय माहिती मिळाली की, सचिन सोमनाथ गायकवाड रा.घाटरोड, चाळीसगाव ता.चाळीसगा, जि.जळगाव, अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव हे अहमदनगर व पुणे येथे गेल्याची माहिती मिळाली होती. एलसीबीच्या पथकातील पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, हवालदार सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील यांना तात्काळ अहमदनगर व पुणे येथे रवाना केले. त्याप्रमाणे वरील पथकातील पोलीस अंमलदार यांनी वरील आरोपीतांचा अहमदनगर व पुणे येथे गोपनिय माहितीच्या आधारे शोध घेत असतांना त्यांना माहिती मिळाली की, सदर आरोपी हे लोणीकंद परिसर, पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपींना लोणीकंद परिसरात पिंजून काढून शिताफिने ताब्यात घेतले.
पोलीस कारवाई करतांना तपासात हवालदार अक्रम शेख, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, शिवदास नाईक, हेमंत पाटील, किशोर मोरे, ईश्वर पाटील यांनी सुध्दा सहकार्य केले आहे. आरोपीतांना तपासकामी चाळीसगाव शहर पो.स्टे.च्या ताब्यात देण्यात आले आहे.