पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव l ८ ऑगस्ट २०२३ l महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह १५ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महिला व बालविकास क्षेत्रात किमान २५ वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. यापूर्वी जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमित्र व सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त महिला पुढील पाच वर्षासाठी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत. विभागीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान ७ वर्ष काम केलेले असावे.यापूर्वी दलितमित्र पुरस्कार प्राप्त झालेला नसाव. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान १० वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्या महिला जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी अर्जदाराच्या कार्याचा तपशिल, वृत्तपत्र, छायाचित्रे, सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहे. यापूर्वी पुरस्कार मिळाले आहेत काय ? असल्यास तपशिल आवश्यक आहे. विभागीयस्तरीय पुरस्कारासाठी संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल, वृत्तपत्र, छायाचित्रे, संस्थेस यापूर्वी पुरस्कार मिळाले आहे काय ? असल्यास तपशिल आवश्यक आहे. संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत आवश्यक आहे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी दहा हजार एक रूपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ तसेच विभागीयस्तरीय पुरस्कारासाठी पंचवीस हजार एक रूपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे स्वरूप आहे.
सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२३ या वर्षाकरिता या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव ( दूरध्वनी-०२५७-२२२८८२८) या पत्त्यावर संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती सोनगत यांनी केले आहे.