खान्देशगुन्हेजळगांव

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

जळगाव : आगामी सण-उत्सव आणि विधान परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या आणि शहरात दहशत निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी २१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (१) अन्वये हे आदेश जारी केले. संबंधित आरोपींना आदेश प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसांच्या आत जळगाव जिल्ह्याच्या हद्दीबाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढील एक वर्ष जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सक्षम अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय त्यांना जिल्ह्यात येता येणार नाही.

तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राम उर्फ सोनू भगवान सारवान (रा. गुरुनानक नगर, जळगाव) याचा समावेश आहे. त्याच्यावर घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे, मारामारी तसेच यापूर्वीच्या तडीपार आदेशाचे उल्लंघन करून गंभीर गुन्हे केल्याचे आरोप आहेत. त्याच्याविरोधात १३ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दुसरा आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी, चांगापाचा मंदिराजवळ, जळगाव) याच्यावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. घातक शस्त्रांचा धाक दाखवून नागरिकांना धमकावणे, रात्रीच्या वेळी दुकाने व घरफोड्या करणे तसेच मारहाणीच्या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले.

तडीपारीच्या कालावधीत दोन्ही आरोपींना ज्या ठिकाणी वास्तव्यास राहतील त्या परिसरातील जवळच्या पोलीस ठाण्यात दरमहा हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, “शहरात दहशत निर्माण करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. नागरिकांनी निर्भयपणे राहावे. जळगाव पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत,” असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button