
“माझे मरण तरी माझ्या घरात होईल का?”… प्रश्न अनुत्तरितच; हक्काच्या घरासाठी झगडणाऱ्या वृद्धेचा अखेरचा श्वास
शिवाजीनगर घरकुल योजनेतील लाभार्थी वत्सलाबाई सोनवणे यांचे निधन; निवेदनांचे गठ्ठे वाढले, पण हक्काचे घर मिळण्यापूर्वीच आयुष्य संपले
जळगाव | प्रतिनिधी
हक्काच्या घरासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या आणि प्रशासनाच्या दारात वारंवार हेलपाटे मारणाऱ्या ८५ वर्षीय वत्सलाबाई सोनवणे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र, त्यांच्या मृत्यूपेक्षाही अधिक वेदनादायी बाब म्हणजे, ज्या घरासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला, त्या घराचे स्वप्न त्यांच्या डोळ्यांसमोरच अपूर्ण राहिले.

शिवाजीनगर घरकुल योजनेतील लाभार्थी असलेल्या वत्सलाबाई अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत होत्या. प्रशासनाकडे वारंवार निवेदने देणे, अधिकाऱ्यांची भेट घेणे, लोकप्रतिनिधींकडे न्याय मागणे, हा त्यांचा नित्यक्रमच बनला होता. पण प्रत्येक वेळी त्यांना केवळ आश्वासनांचीच उब मिळाली; हक्काच्या घराची चावी मात्र त्यांच्या हातात पडली नाही.
काही महिन्यांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेताना वत्सलाबाईंनी अश्रू अनावर होत, “साहेब, माझे मरण तरी माझ्या घरात होईल का?” असा हृदय पिळवटून टाकणारा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाकडे नव्हते आणि आजही नाही.
तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यापासून ते ज्ञानेश्वर ढेरे यांच्यापर्यंत निवेदनांचा प्रवास सुरूच राहिला. मात्र, फाईली हलल्या नाहीत, निर्णय झाले नाहीत आणि एका वृद्ध महिलेचे अखेरचे स्वप्नही अपूर्णच राहिले.
वत्सलाबाईंच्या निधनामुळे शिवाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मृत्यूने केवळ एका वृद्धेचा अंत झालेला नाही, तर हक्काच्या घरासाठी झगडणाऱ्या सर्वसामान्यांच्या आशा-अपेक्षांवरही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज वत्सलाबाई नाहीत, पण त्यांचा तो एकच प्रश्न जळगाव महापालिकेच्या ढिम्म प्रशासनाला कायम छळत राहणार आहे – “माझे मरण तरी माझ्या घरात होईल का?”
वत्सलाबाई गेल्या… पण त्यांचे हक्काचे घर अजूनही त्यांच्या प्रतीक्षेतच उभे आहे.





