स्वच्छ, हरित आणि समृद्ध जळगावसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक
महापालिकेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण

स्वच्छ, हरित आणि समृद्ध जळगावसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक
महापालिकेत ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात; महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण
जळगाव | प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव शहर महानगरपालिकेत स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. महापालिका प्रांगणात महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वंदे मातरम्, राष्ट्रगीत आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी महापालिका परिसर दुमदुमून गेला.
या सोहळ्यास महापालिका आयुक्त आदित्य जीवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विकासासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा
ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना महापौर दीपमाला काळे यांनी शहरवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देश विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकासाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करीत असून, या प्रगतीमध्ये जळगाव शहर आणि नागरिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
जळगाव शहर अधिक स्वच्छ, हरित, सुरक्षित आणि समृद्ध बनविणे हे महापालिका प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगत त्यांनी मूलभूत सुविधांचा विस्तार, आरोग्य सेवा सक्षम करणे, दर्जेदार शिक्षणाला चालना देणे आणि शहरातील पायाभूत सुविधांचा विकास यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
‘आपले शहर, आपली जबाबदारी’
शहराच्या विकास प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. जळगावला देशातील विकसित आणि आदर्श शहरांच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसराची स्वच्छता राखणे, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि वाहतूक व इतर नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रफुल्ल देवकर यांच्यासह महापालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध विभागांचे प्रमुख, नगरसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.





