
बिहारलाही लाजवेल अशी अमानुष मारहाण तरुणाला विवस्त्र करून पट्ट्याने झोडपले, सिगारेटचे चटके
भुसावळातील घटनेने जिल्हा हादरला ; व्हिडीओ व्हायरल
चार महिने उलटूनही कारवाई शून्य; पीडित मातेची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव!
जळगाव : गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी ‘कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणून फुशारक्या मारणाऱ्या जळगाव पोलिसांच्या नाकाखाली एका १८ वर्षीय तरुणावर ‘बिहारलाही लाजवेल’ अशी अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाला नग्न करून, हातपाय बांधून कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली आणि एवढ्यावरच न थांबता त्याला सिगारेटचे चटकेही देण्यात आले. या हैवानिअतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्याची बदनामी करण्यात आली.तरुणाच्या फिर्यादीवरून २४ एप्रिल रोजी सौरभ सोनवणे (रा. भारत नगर), सिद्धेश महाडीक (रा. रेड चर्चजवळ, कृष्णा कॉलनी), सागर साळुंके (रा. भारत नगर) आणि वासिफ शेख (रा. खडका चौफुली, ईदगाहजवळ) या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला मात्र तब्बल चार महिने उलटूनही भुसावळ शहर पोलिसांनी संशयितांवर कोणतीही कडक कारवाई न केल्याने, अखेर पीडित तरुणाच्या हताश आईने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन न्यायासाठी टाहो फोडला आहे.
भुसावळ येथील रहिवासी १८ वर्षीय तरुणाला २३ एप्रिल रोजी त्याच्या मित्राने फोन करून भारत नगर परिसरात बोलावले. तेथून त्याला जमनेर रोडवरील एका पडक्या घरात नेण्यात आले. एका मुलीकडे पाहण्याच्या क्षुल्लक वादातून चौघांनी त्याला खाली पाडले, त्याचे कपडे उतरवून त्याला विवस्त्र केले आणि हातपाय बांधून पट्ट्याने व चाबकाने अमानुष मारहाण केली. आरोपींनी त्याला सिगारेटचे चटके देत त्याच्या गळ्यातील सोन्याचे मणी, चांदीची साखळी, ब्रेसलेट आणि रोकड लुटली. मारहाण करूनही मन भरले नाही म्हणून नराधमांनी या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
रक्षकच भक्षक बनले तर न्याय कोणाकडे मागायचा? असा उद्विग्न सवाल उपस्थित करत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे तक्रार पाठवली आहे. तसेच मानवाधिकार आयोग, जिल्हा न्यायाधीश आणि पोलीस महासंचालकांना निवेदनाच्या प्रती पाठवल्या आहेत.
मुलगा खचला, घर सोडायला तयार नाही!
या घटनेनंतर आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे १८ वर्षांचा हा तरुण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला आहे. त्याचा जबडा गंभीररीत्या दुखावला असून त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. भीती आणि बदनामीमुळे त्याने परीक्षाही दिली नाही आणि तो गेल्या चार महिन्यांपासून घराबाहेर पडण्यासही तयार नाही.
मंत्र्यांकडे धाव घेऊनही दिलासा नाही!
कुटुंबीयांनी यापूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती. मंत्र्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र पोलिसांची ढिम्म भूमिका कायम राहिली. अखेर १३ ऑगस्ट रोजी पीडित मातेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींना बेड्या ठोकण्याची मागणी केली.
‘बालेकिल्ला’ की गुन्हेगारांचा अड्डा?
सामान्य भुरट्या चोरांना पकडून “जळगाव जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे” असे वदवून घेत व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या पोलीस दलाचा धाक आता गुन्हेगारांवरून संपला आहे का? असा रोखठोक सवाल सुज्ञ नागरिकांमधून विचारला जात आहे. यातील एका आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून तो नुकताच गोळीबाराच्या प्रकरणातून कारागृहातून बाहेर आला आहे. अशा सराईत गुन्हेगारांना पोलीस कोणाचे पाठबळ देत आहेत, असा सवाल आता उपस्थित होत आहे.





