
गावठी कट्टा-कोयत्यासह दहशत माजविण्याचा डाव उधळला
एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; दोन संशयितांना अटक, शस्त्रसाठा जप्त
जळगाव (प्रतिनिधी): शहरातील कासमावाडी परिसरात गावठी कट्टा आणि धारदार कोयता घेऊन दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने अटक केली. या कारवाईत शस्त्रसाठ्यासह दुचाकी जप्त करण्यात आली असून, संशयितांविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १४ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके यांच्यासह पथकाने कासमावाडी, नेरी नाका परिसरात सापळा रचला.
एकता चौकाजवळ दुचाकीवरून येणाऱ्या दोन संशयितांना थांबण्याचा इशारा देण्यात आला. मात्र त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. झडतीदरम्यान एकाच्या कमरेला गावठी कट्टा, तर दुसऱ्याकडे धारदार लोखंडी कोयता आणि कट्ट्याचे रिकामे मॅगझीन आढळून आले.
पोलिस चौकशीत आरोपींची नावे रोहित गोपाळ कुंवर (वय २२, रा. कासमावाडी) आणि सागर रामा सोनवणे (वय २१, रा. आसोदा रोड, जळगाव) अशी निष्पन्न झाली. दोघांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ७० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात गावठी कट्टा, धारदार कोयता, दुचाकी आणि मॅगझीनचा समावेश आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार किरण चौधरी व योगेश घुगे करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पार पडली.
“शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई सुरूच राहील.”
— पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एमआयडीसी पोलीस ठाणे





