
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक; चौघांना बेड्या
मुंबई सायबर गुन्हे शाखेची कारवाई; आरोपींकडून २५ लाखांची रोकड जप्त
जळगाव | प्रतिनिधी मुंबईतील एका महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून ६५ लाख रुपये उकळल्याच्या गंभीर प्रकरणात मुंबई सायबर गुन्हे शाखेने जळगाव जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी तरसोद येथील मुख्य संशयितासह जळगाव शहरातील अन्य तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
असा रचला सापळा
मुंबईतील एका महिलेला सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली धमकावून ६५ लाख रुपयांचा चुना लावला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना मुंबई सायबर क्राईम शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम जाधव यांच्या पथकाला जळगावमधील धागेदोरे मिळाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने तरसोद (ता. जळगाव) येथील जयेश काळे (वय २६) याला ताब्यात घेतले. जयेशची सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या अन्य साथीदारांची नावे उघड केली.
जळगावातून तिघे अटकेत
मुख्य आरोपीच्या कबुलीवरून पोलिसांनी जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील संकेत सोपान महाजन (वय २८) आणि यशवंत शालिक धांडे (वय २९) यांना एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने अटक केली. तपासादरम्यान आरोपींनी सांगितले की, मुख्य सूत्रधाराच्या सूचनेनुसार त्यांनी मुंबईत जाऊन फिर्यादीकडून २५ लाख रुपये रोख घेतले होते. ही रक्कम जळगावात आणून विनोद प्रकाश अत्तरदे (वय ३८, रा. खेडी, जळगाव) याच्याकडे सोपवण्यात आली होती. पोलिसांनी विनोद अत्तरदे यालाही बेड्या ठोकल्या आहेत.
कंबोडिया कनेक्शन आणि रोकड जप्त
पोलिसांनी आरोपींकडून २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. मुख्य आरोपी जयेश काळे हा यापूर्वी कंबोडियामध्ये नोकरीला होता, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. परदेशातील सायबर रॅकेटशी त्याचे संबंध असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. अटक केलेल्या चारही आरोपींना पुढील तपासासाठी मुंबईतील वांद्रे येथील सायबर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
सायबर गुन्ह्यांचे लोण ग्रामीण भागात
’डिजिटल अरेस्ट’ सारख्या हायप्रोफाईल सायबर गुन्ह्यांचे जाळे आता खानदेशातील ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही निनावी फोन कॉल्स किंवा ऑनलाईन धमक्यांना बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.





